दिलीपकुमारांनी घेतली सभा; पण…

निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत आणण्यासाठी सिनेकलाकारांचा वापर करून घेणे हा प्रवाह गेली अनेक वर्षे भारतीय राजकारणात दिसून येत आहे. अर्थात, जनतेचा मूड जर बदललेला असेल तर बड्या तारे-तारकांच्या सभा होऊनही त्या मतदारसंघातून संबंधित उमेदवाराला पराभव पत्करावा लागू शकतो. अशी अनेक उदाहरणे भारतात पाहायला मिळालेलीही आहेत.

1991 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही असेच घडले होते. बॉलीवूड अभिनेते दिलीपकुमार हे नैनिताल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या एन. डी. तिवारी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले. बहेडीमध्ये त्यांनी विराट जनसमुदायासमोर भाषणही केले. त्यावेळी बहेडी हा नैनिताल मतदारसंघाचा एक भाग होता. तेथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त होती. त्यावेळी दिलीपकुमार यांनी मुस्लीम मतदारांना एन. डी. तिवारींना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी सभेला आलेल्या अनेकांना पहिल्यांदाच हे समजले की दिलीपकुमार यांचे खरे नाव युसूफ खान आहे. लोकांना त्यांनी नाव बदलून सिनेसृष्टीत दिलीपकुमार हे नाव स्वीकारलेलं फारसं रुचलं नाही. अनेक जण त्यामुळे नाराज आणि संतप्त झाले. हा राग आणि नाराजी इतकी होती की हा मुद्दा तिवारींच्याही विरोधात गेला आणि या निवडणुकीत तिवारी किमान 5000 मतांनी पराभूत झाले.

भाजपाचे माजी खासदार बलराज पासी सांगतात की, त्यांच्यातर्फे तेव्हा हल्द्वानीमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी जनसभा घेतली होती. ही निवडणूक ते जिंकले होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर कॉंग्रेसमध्ये एन. डी. तिवारींएवढा प्रभावी आणि अनुभवी नेता दुसरा कोणी नव्हता. त्यामुळे एन. डी. जर ती निवडणूक जिंकले असते तर ते पंतप्रधान बनले असते; परंतु त्यांचा पराभव झाल्यामुळे पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)