दिलीप कुमार अत्यवस्थ; ICU मध्ये उपचार सुरु

मुंबई – प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा म्हणून शुभेच्छा दिल्या.

श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने कुमार साहेब यांना खार रोड येथील रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्‍टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या काही चाचण्या केल्या आहेत. त्याच्या अहवालाची वाट पाहात आहोत. त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून तुम्ही ईश्‍वराकडे प्रार्थना करा, त्यामुळे आम्ही त्यांना लवकर घरी घेऊन जाऊ शकू, असे भावनिक उद्‌गार सायरा बानू यांनी काढले.

दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याबाबत माहिती देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, दिलीप कुमार यांना करोनाबाह्य पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्‍वसनाचा त्रास झाला. डॉ. नितीन गोखले यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. साहेबांसाठी प्रार्थना करा आणि सुरक्षित राहा.

शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली. त्याबाबत ट्विट केले असून त्यात ते म्हणतात, प्रख्यात अभिनेते श्री. दिलीप कुमारजी यांची खार हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्यावरील उपचाराविषयी सायरा बानू यांच्यासह माहिती घेतली. दिलीप कुमार यांना लवकर बरे वाटावे म्हणून मी प्रार्थना करतो.

या 98 वर्षीय अभिनेत्याला गेल्या महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळाने त्यांना घरी सोडण्यात आले होते. हिंदुजामध्ये ते दोन दिवस होते. त्यांचे काही आरोग्य निर्देशांक योग्य नसल्याचे निदान करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांचे खरे नाव महंमद युसुफ खान असे होते. भारतातील सर्वकालीन उत्तम अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. किला या चित्रपटात त्यांनी 1998 मध्ये अखेरचे काम केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.