दिलीप खैरे यांचा राष्ट्रवादीला इशारा
बारामती – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरु केलेले राजकारण थांबवावे, अन्यथा जशात तसे उत्तर देण्याचा इशारा महानंदचे संचालक दिलीप खैरे यांनी दिला आहे.
खैरे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. कोथरुड मतदारसंघात पाटील यांच्या विरोधात महाआघाडीला उमेदवारही देता आला नाही. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की महाआघाडीवर ओढवली.
शरद पवार यांच्याकडून यापूर्वी चंद्रकांत पाटील यांना जनतेतून निवडून येण्याचे आव्हान दिले जात होते. हे आव्हान पाटील यांनी पेलून दाखवले. कोथरुडमध्ये त्यांनी विजय मिळविला. निवडणूक निकालानंतर त्यांनी मतदारसंघातील भगिणींना भाऊबिजेनिमित्त साडी वाटप केले. या तकाहीही गैर नाही. परंतु, राष्ट्रवादीकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून पाटील यांना नाहक टार्गेट केले जात आहे.
पाटील यांनी साडी वाटप केल्यानंतर राष्ट्रवादीने केलेले आंदोलन निव्वळ स्टंटबाजी आहे. यापुढील काळातही पाटील हे बारामतीत पक्ष विस्तारासाठी ताकद देतील. आम्हीही निकालातून योग्य तो बोध घेत पक्ष बांधणीसाठी आवश्यक ते प्रयत्न करू. परंतु राष्ट्रवादीने त्यांना लक्ष्य करणे थांबवले नाही तर आम्हीही जशास तसे उत्तर देवू.