सोलापूरसाठी भाजपची दिलीप कांबळेंना गळ?

उमेदवार बदलीसाठी हालचाली : लोकसभेसाठी केली थेट विचारणा

पुणे – मागील लोकसभा निवडणुकीत थेट तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव करत सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावर्षी भाजपकडून उमेदवार बदलीसाठी हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप कांबळे यांना पक्षाने गळ घातली आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांना थेट विचारणा करण्यात आली असली तरी, त्यांनी अद्याप त्याबाबत काहीच निर्णय दिला नसल्याचे कांबळे यांच्या निकटवर्तीयांकडून खासगीत सांगण्यात येत आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपच्या अॅड. शरद बनसोडे यांनी पराभव केला होता, त्याची बक्षिसी म्हणून केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत पहिल्या 100 शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आता युती झाली असली तरी, हा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात आहे. त्यातच, खासदार बनसोडे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपकडून अॅड. बनसोडे यांना पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे आधी डॉ. महास्वामी आणि राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, कॉंग्रेसकडून पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांना तर वंचीत बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे एका बाजूला अॅड. बनसोडे यांच्याबाबत असलेली नाराजी आणि दुसऱ्या बाजूला समोर असलेले दिग्गज याचा फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी उमेदवार शोधला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यातून राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे नाव पुढे आले आहे.

कांबळेंकडून सावध पवित्रा
याबाबत कांबळे यांना पक्षाकडून याठिकाणावरून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याची माहिती त्यांची निकटवर्तीयांकडून देण्यात आली. मात्र, कांबळे याठिकाणीहून निवडणूक लढविण्याबाबत इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे सद्यातरी त्यांनी सावध पवित्रा घेतला असून अद्याप तरी पक्षाला आपला निर्णय कळविलेला नाही. मात्र, पक्षादेश आल्यास कांबळेही सोलापुरच्या निवडणुकीच्या रिंगण्यात दिसण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)