पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा समर्थकांचा दावा
भोपाळ – मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना कर्नाटकातील ज्या रिसॉर्ट मध्ये ठेवले आहे त्या रिसॉर्ट मध्ये भेटदेण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह तेथे दाखल झाले पण पोलिसांनी त्यांना आमदारांची भेट घेण्यापासून रोखले. त्यांना तेथून खेचून बाहेर नेण्यात आले असा दावा केला जात आहे. त्यामुळे दिग्विजयसिंह यांनी तेथेच रिसॉर्टच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कर्नाटकात दिग्विजयसिंह यांना जी वागणूक दिली त्याचा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निषेध केला असून ही भाजपची हिटलरशाही आहे असे त्यांनी म्हटले आहे. गरज भासल्यास आपणही कर्नाटकच्या राजधानीत जाऊ असेही कमलनाथ यांनी म्हटले आहे. कमलनाथ यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्यप्रदेशातील काहीं मंत्र्यांनी बंगलुरूच्या रिसॉर्ट मध्ये कोंडून ठेवण्यात आलेल्या आमच्या पक्षाच्या आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तेथे रोखण्यात आले. त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन करून त्यांना तेथून ताब्यात घेण्यात आले. ही हिटलरशाही आहे. मध्यप्रदेशातील लोकनियुक्त सरकार कसे अस्थिर केले जात आहे ते सारा देश पहात आहे. भाजपला जर हे आमदार आपल्या बरोबर आले आहेत असे वाटत असेल तर ते त्यांना मोकळे का सोडत नाहीत, भाजपला कशाची भीती वाटते आहे असा सवालही कमलनाथ यांनी केला आहे.
या आमदारांची भाजपने त्वरीत सुटका करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या सोळा आमदारांना एकट्या दिग्विजयसिंहांनी भेटण्याने भाजपला काय फरक पडणार होता असा सवालही त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने या आमदारांना भोपाळ मध्ये हजर करून दाखवावे अशी सुचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की आम्ही सत्तेवर आल्यापासून किमान पंधरावेळा विधानसभेच्या सभागृहात आमचे बहुमत सिद्ध केले आहे. बंगलुरू येथे डांबून ठेवलेल्या आमदारांना भेटू देण्यात यावे अशी मागणी करणारी याचिकाही कॉंग्रेस पक्षाच्यावतीने सुप्रिम कोर्टात करण्यात आली आहे.