पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत प्रवासासाठी डिजिटल पास

पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची शासकीय, खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर बंधने आली आहेत. तथापि, अत्यावश्यक कारणासाठी महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

डिजिटल पास मिळविण्यासाठी महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ऍप्लिकेशनवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. डिजिटल पास संबंधित क्यूआर कोड एसएमएसवर पाठविला जाईल. हे डिजिटल पास फक्त शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठीच आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिका यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या नियमाला अधीन राहून हे पास देण्यात येतील. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी, राज्य किंवा केंद्र शासनातील शासकीय कर्मचारी, बॅंक आणि एटीएम, गॅस, एलपीजी, पेट्रोल पंप, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक आणि पुरवठादार, टेलिकॉम इंटरनेट केबल, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, सुरक्षा सेवा, इतर अत्यावश्यक सेवा, इतर सवलत दिलेली श्रेणी, नागरिकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अन्न वितरण वाहन आदी श्रेणींसाठी डिजिटल पास उपलब्ध आहेत.

अर्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत पासबाबत स्वीकृती अथवा नकार कळविण्यात येईल. ही सुविधा महापालिकेच्या सारथी ऍपवर सोमवारपासून (दि. 11) उपलब्ध होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.