पुणे – जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून लहान वयोगटातील कुपोषित मुलांची माहिती गोळा केली जाते. परंतु आता 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचे आरोग्य चांगले राहवे, यासाठी त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना डिजिटल हेल्थ कार्ड देण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे कुपोषित मुलांबरोबरच इतर सर्वच मुलांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच खासगी शाळांतील 3 ते 14 वयोगटातील मुलांचा समावेश असेल. डिजिटल हेल्थ कार्ड दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून दोनवेळा तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी जवळपास 1 हजार 228 मुले कुपोषित आढळली होती. त्यात हवेली, खेड, इंदापूर आणि जुन्नरमध्ये सर्वाधिक कुपोषित मुले होती. यामुळे मुलांमध्ये येणाऱ्या आजारांची माहिती तसेच त्यावर उपाययोजना करण्यासोबतच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी ही डिजिटल हेल्थ कार्ड योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
मार्चपासून मिळणार लाभ
ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांशी जोडलेले कर्मचारी व डॉक्टर यांचीही यासाठी मदत मिळणार आहे. यातून मुलांना होणाऱ्या विविध आजारांवर देखरेख ठेवली जाईल. त्यांच्या आरोग्याच्या चार्टवर त्यांना उपचार दिले जातील. तसेच जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, खासगी व शासकीय शालेय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ माचपासून देण्यात येणार आहे.