पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ “नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील “उत्कृष्टता केंद्र’ सुरू करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होणार आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि आयडियालॅब्स फ्युचरटेक व्हेंचर्सचे संस्थापक पंकज दिवाण यांनी सोमवारी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.
या उत्कृष्टता केंद्रामार्फत डिजिटल शेती या विषयावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सला मार्गदर्शन केले जाणार आहे. यात डिजिटल प्रयोगशाळा आणि मेकर स्पेसचा समावेश असेल. या केंद्रातर्फे नव्या तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जातील.
विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल व त्याद्वारे शेतीशी निगडित समस्यांवर उपाय शोधणारी उत्पादने तयार करता येतील. हे उत्कृष्टता केंद्र चालवताना आयडियालॅब्सकडे असलेल्या कौशल्याचा विद्यापीठाला फायदा होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनक्यूबेशन सेंटरने नवनवीन संशोधन करण्याकरिता शेतीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. आयडिया लॅब्स यांच्या सहकार्याने शेती क्षेत्रात पुणे विद्यापीठ नक्कीच उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ