हरणांचा कळप होते लक्ष्य ः पठाणवस्तीत तरुणांच्या सावधपणामळे अनर्थ टळला
रावणगाव (वार्ताहर) – खडकी (ता.दौंड ) येथील पठाणवस्ती परिसरात रविवारी (दि. 22) रात्री साडेआठच्या सुमारास पठाण वस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात मोरे वस्ती येथे रात्री दहाच्या सुमारास तुषार मोरे आणि मोतीराम काळे त्यांच्या शेतात पिकाला पाणी देत असताना शंभर ते दोनशे फूट अंतरावर बिबट्या दिसला होता आणि काही क्षणातच त्याने त्या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांनी प्रसंगावधान राखून त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅटऱ्यांचा फोकस त्याच्या डोळ्यावर मारल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली होती..
या घटनेमुळे लोक भयभीत झालेले नागरिक सावध होते, त्यामुळे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पठाण वस्तीच्या एका बाजूला काही तरुण गस्त घालत असताना वस्तीच्या एका टोकाला काही हरणांचा कळप धावत आला आणि त्या पाठोपाठ बिबट्या पाठलाग करताना दिसला. त्यामुळे तेथील तरुणांनी काही ट्रॅक्टर, स्कॉर्पिओ जीपने बिबट्याचा पाठलाग करत डोंगराच्या दिशेने जवळपास एक ते दीड तास पाठलाग करून वस्तीवरून डोंगरावर हुसकावुन लावले. वस्तीजवळ ऊस शेती, दाट झाडी, एक तलावही आहे, त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे.
तरस नव्हे बिबट्याच…
याबाबत दौंड वनाधिकारी महादेव हजारे यांच्याशी संपर्क साधला असता हा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे त्यांनी सांगितले आणि व तरीसुध्दा घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना पाठवून तपास करतो, असे त्यांनी सांगितले परंतू प्रत्यक्षदर्शींच्या मते तो बिबट्याच असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांनी शंभर फुट अंतरावरून तो प्राणी पाहिला असल्याने तो बिबट्याच असल्याचे नागरिकसांगत आहेत.
सध्या शेतात ऊस, कांदा लागवड, खुरपणी, विविध पिकांना पाणी देणे, ऊस तोडणी अशी कामे शेतकरी करीत आहेत. त्यातच खडकी परिसरात बिबट्याचे दोनदा दर्शन झाल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
– शब्बीर पठाण, ग्रामस्थ, पठाणवस्ती, खडकी