दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा

जयघोषात दुमदुमले नारायणपूर ः पालखी सोहळ्यात पुष्पवृष्टी, हत्ती, घोडे, उंटांचा साज
वाघापूर (वार्ताहर) – श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे टाळ-मृदंगाचा जयघोष, तुतारीचा निनाद आणि “दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) दत्तजयंती सोहळ्याची सांगता झाली.

यावेळी ढोल-ताशांचा गजरात मुखवट्याची छत्री, अब्दागिरी, फुलांनी सजविलेल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हत्ती, घोडे आणि उंट यांचा समावेश होता. या मिरवणुकीने प्रसन्न वातावरणात आणि उत्साहात तीन दिवस सुरू असलेल्या दत्त जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली.

नारायणपूर येथे सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी शिवदत्त नाम यज्ञाचा 19 वा वर्धापनदिन असून, सोमवारी (दि. 9) डिसेंबर या जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला. सायंकाळी 4 वाजता यज्ञ कुंडावर यज्ञ सोहळ्यास सुरुवात झाली. संध्याकाळी दीपपूजा व अर्चना साहित्य वाटप आणि शिवदत्त नामाचे वाचन झाले. त्यानंतर आरती, दीप परिक्रमा, गंध दर्शन आणि घुगऱ्याचा प्रसाद आदी कार्यक्रम पार पडले.

मंगळवारी (दि. 10) सकाळी आरती, दुपारी येणाऱ्या सर्व दिंड्या पालख्यांचे स्वागत, 4 ते 5 या वेळात पादुकांवर अभिषेक आणि सायंकाळी 5 ते 6 भजनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 6 ते 7 या वेळात दत्त जन्म सोहळ्याचे व्याख्यान, त्यानंतर बरोबर 7 वाजून 3 मिनिटांनी दत्तजन्म सोहळा पार पडला. याप्रसंगी शोभेची दारू उडविण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. त्यानंतर महाआरती, महाप्रसाद, रात्री कीर्तन, भजन असे कार्यक्रम पार पडले.

बुधवारी (दि. 11) पहाटे 4 ते 6 रुद्राभिषेक, सकाळी 6 ते 7 होमहवन झाले. 8 ते साडेआठ या वेळात आरती घेण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता श्रींच्या मुखवट्याची फुलांनी सजविलेल्या पालखीतून भव्य मरवणूक काढण्यात आली. यामध्ये हत्ती, उंट, घोडे, या बरोबरच पारंपरिक वाद्ये, ढोल पथके यांनी छबिने सादर केले. यावेळी परमपूज्य नारायण महाराज आकर्षक रथामध्ये विराजमान झाले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

सकाळी 10 वा चंद्रभागा कुंडावर पादुका आणि मूर्तींना महास्नान घालण्यात आले. सुमारे दोन तास हा विधी सुरू होता. नंतर मिरवणूक प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात पोहोचल्यानंतर दुपारी 1 वाजता नारायण महाराजांचे मार्गदर्शन झाले. 2 वाजता महाआरती व त्यानंतर माधुकरी मागण्यात येऊन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी पालखीची पुन्हा ग्रामप्रदक्षिणा काढून मंदिरात महाआरती घेण्यात आली. सुमारे तीन दिवस सुरू असलेल्या दत्त जयंती सोहळ्याची मोठ्या उत्साहात आणि दिमाखात सांगता करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.