शेतात खड्डा करा, बल्ब लावा अन् हुमणी घालवा

करंदीतील शेतकरी बंधूंचा प्रयोग यशस्वी

शिक्रापूर  (वार्ताहर) – करंदी (ता. शिरूर) येथील शेतकरीबंधूंनी शेतात एक खड्डा करून त्यात बल्ब लावत हुमणी नष्ट करण्यात यश मिळवले आहे. कमी खर्चात लाखमोलाची पिकांचा हुमणी व किडीपासून बचाव होत असल्याने त्यांचा हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.

गुरुदास चंद्रावळे व भगवान चंद्रावळे या बंधूंनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. याबाबतची माहिती अशी की, चंद्रावळे यांच्या शेतामध्ये ऊस, भुईमूग व आदी पिके जोमाने उभी राहिलेली असताना अचानक या पिकांवर हुमणी या आळीचा प्रादुर्भाव होऊ लागला व त्यामुळे पिके नष्ट होतात की काय, अशी चिंता त्यांना सतवू लागली, यासाठी कीटकनाशक औषधे फवारणी करण्यासाठी खर्च परवडणारा नाही.

सध्या शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वेगळ्याच चिंतेत असताना शेतीसाठी खर्च करायचा कसा, ही शेतकऱ्यांची काळजी वेगळीच असताना आपण या हुमणीला नष्ट करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्यामुळे या बंधूंनी प्रयोग करण्याचे ठरवले व त्यांनी एक प्रयोग केला अन् तो यशस्वी ठरला आहे. या प्रयोगामुळे दररोज शेतामध्ये दोन हजारपेक्षा अधिक हुमणी अळी मृत्युमुखी पडत आहेत. या प्रयोगामुळे शेतातील पिकांचे चांगल्या प्रकारे रक्षण होत आहे. येथील शेतामध्ये पाच ठिकाणी अशा पद्धतीची प्रक्रिया करण्यासाठी फक्त एक हजार रुपये खर्च आला असल्याचे चंद्रावळे बंधूंनी सांगितले.

असा आहे प्रयोग…

चंद्रावळे बंधूंनी त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्याने शेतात खड्डा घेतला त्यामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरून त्यामध्ये पाणी आणि डिझेलचे मिश्रण टाकले आणि त्यावर एक बल्ब लावला असल्यामुळे रात्रीच्या वेळी बल्बच्या आकर्षणाने हुमणीचे किडे त्यामध्ये पडत आहे. दररोज एका खड्ड्यामध्ये 400 ते 500 किडे पडत असल्यामुळे शेतीच्या पिकांचे रक्षण होत असून प्रयोग यशस्वी झाला आहे. तरी या पद्धतीचा वापर करून आपले पीक वाचवू शकतो, असे चंद्रावळे बंधूंनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.