शिक्षक बदल्या तोंडावर ः शाळा तपासणीचे काम संथ गतीने
काम नेमके होणार तरी कधी? : शिक्षण विभागाचे आणखी एक आश्वासन
पुणे – जिल्ह्यातील अवघड-सोप्या शाळांच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू असून, लवकरच नवीन यादी तयार करण्यात येईल, असे अश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, महिन्याभरात शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू होईल, त्या आधी ही अवघड-सोप्या शाळांचे सर्वेक्षण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील शाळांनी पाहणी करून ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात येतात त्याच्या नोंदी बदलण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार शाळांचे सर्वेक्षण सुरू असून, लवकरच नवीन यादी तयार करण्यात येणार आहे, असे आश्वासन देऊन अनेक महिने झाले तरीही अद्याप अवघड-सोप्या क्षेत्रातील शाळांची यादी तयार झाली नाही. यादी सोडा सर्वेक्षणच झाले की नाही याबाबत शंका असून, त्याबाबत शिक्षण विभागाला विचारले असता, “सर्व्हेक्षण सुरू आहे’ असे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात 3,600 हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील आणि सोप्या क्षेत्रातील शाळा अशा दोन नोंदी आहेत. त्यामध्ये 934 शाळा अवघड क्षेत्रात आहेत. अवघड क्षेत्र म्हणजे दुर्गम किंवा डोंगराळ भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून लांब किंवा दळणवळणाची सुविधा नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात होतो. त्यामुळे बदलीवेळी शिक्षक मंडळी अशा अवघड क्षेत्रात जाण्यास टाळाटाळ करतात.
तर काही शिक्षण हे आनंदाने अवघड क्षेत्रात जाऊन ज्ञानदान करतात. दरम्यान, जिल्ह्यात काही शाळांपर्यंत रस्ते पोहचले, दळणवळणाच्या सुविधा सुरू झाल्या, तरीही त्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये गणल्या जात आहेत. शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांची पाहणी होते. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील शाळा ह्या सोप्या क्षेत्रात येत असल्याचे अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, या बदलाबाबत नियमावलीच नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
त्याबाबत तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा तपासणीसाठी समिती स्थापन केली. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील शाळा अशी नोंद असलेल्या शाळा सोप्या क्षेत्रात येत असतील तर त्याचा नोंदी बदलाव्या असे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, शाळा तपासणीचे काम संथ गतीने सुरू असून, नक्की शिक्षण विभागाला काय साध्य करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.