पुणे – पुणे जिल्ह्यात 3 हजार 278 शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यात येणार आहे. करोनामुळे शाळा बंद असल्याने या शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी अडचण येत आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 1 ते 10 मार्चदरम्यान शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दित 821, पुणे महापालिका हद्दित 2 हजार 457 बालके शाळाबाह्य आहेत. करोनाच्या संकटामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दित शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम अद्याप पूर्णपणे राबविण्यात आलेली नाही. विशेष गरजाधीष्टीत असलेल्या बालकांची संख्या 217, बालकामगार 58, अन्य कारणांमुळे शाळाबाह्य बालकांची संख्या 3 हजार 03 अशी आहे.
जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेली 2 हजार 473 बालके आढळून आली. त्यात मुले 1 हजार 363, तर मुली 1 हजार 110 आहेत. अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य ठरलेली बालके 805 एवढे आढळून आली. त्यात मुले 421, तर मुली 384 आहेत.
तालुकानिहाय शाळाबाह्य बालके
आंबेगाव – 121, बारामती – 0, भोर – 34, दौंड- 105, हवेली – 47, इंदापूर – 0, जुन्नर – 26, खेड – 65, मावळ – 27, मुळशी – 345, पुरंदर – 36, शिरूर – 15, वेल्हा – 0. जिल्हा परिषद हद्दीतील 13 तालुक्यामध्ये कधीच शाळेत न गेलेली एकूण 267 बालके आढळली आहेत. त्यात 154 मूले तर 113 मुली आहेत. अनियमित उपस्थितीमुळे 554 बालके शाळाबाह्य ठरली आहेत. त्यात मुले 284, 270 मुली असल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले आहे.