छायांकित प्रत मिळण्यास अडचणी; विद्यार्थ्यांना कार्यालयात माराव्या लागताहेत चकरा

पुणे – विविध कारणांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी अर्ज करण्याबाबत गोंधळ निर्माण होत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या कार्यालयात सातत्याने चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, विभागाकडून याबाबत युद्धपातळीवर काम सुरू असून सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांना शक्‍य तेवढ्या लवकर प्रत उपलब्ध करून देण्याची ग्वाही पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून छायांकित प्रत मिळण्याबाबत आलेल्या अर्जांची मोठी संख्या, शिक्षकांचा अभाव आणि उत्तरपत्रिका शोधण्याबाबत होणारी दिरंगाई यामुळे गेले काही दिवस छायांकित प्रत उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश होतो. त्यामुळे या जिल्ह्यांमधूनही अनेक विद्यार्थी ही प्रत मिळावी यासाठी मंडळाच्या कार्यालयात येत आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना चकरा मारूनही ही प्रत मिळत नसल्याने विद्यार्थी नाराज होत आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर छायांकित प्रत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. मात्र, विविध कारणास्तव त्या तुलनेत शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यातच बारावीच्या विद्यार्थ्यांचे विषय जास्त असल्याने त्या त्या विषयांच्या उत्तरपत्रिका शोधून संपूर्ण “सेट’ तयार करून त्यानुसार प्रत द्यावी लागते. त्यामुळे देखील या प्रक्रियेला विलंब झाला आहे. मात्र, सध्या आमच्याकडील सर्व शिक्षक आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून हे काम पूर्ण करत आहेत.
– बबन दहिफळे, पुणे विभागीय मंडळाचे सचिव

Leave A Reply

Your email address will not be published.