सिध्दू यांच्याकडील खाते काढून घेतले जाण्याची शक्यता
चंदीगड – पंजाबचे नगरविकास मंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे आता कॉंग्रेसमध्येही अस्वस्थ व्हायला लागले आहेत. भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात मदत केली होती. मात्र, सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली असून सिद्धू यांच्याकडून त्यांचे खाते काढून घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरिंदर सिंग यांनी स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये 50 खाती आहेत तरीही फक्त माझ्या खात्याबाबत टीका केली जात आहे असं का, असा प्रश्न सिद्धू यांनी विचारला आहे. अमरिंदर सिंग यांना वाट्टेल ती कारवाई करावी मला खात्याच्या कामकाजाबाबत अहवाल मागितला तर मी तो द्यायला तयार आहे असे सिद्धू यांनी म्हटले आहे.
अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या विभागाचे कामकाज समाधानकारक नसून त्यांचा विभाग बदलण्याची गरज आहे असे विधान केले होते. सिद्धू हे त्यांचे खाते नीट हाताळू शकत नसल्याची टीप्पणीही अमरिंदर सिंग यांनी केली आहे. यामुळे सिद्धू भडकले असून मला कॉंग्रेसच्या लोकांकडून शिव्या देण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या मंत्र्यांबाबत मी काही बोलणार नाही कारण ते माझे भाऊबंद आहे, मी पंजाबसाठी सदैव उभा आहे असे सिद्धू याने म्हटले आहे.