मुंबई – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्याच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन गटांच्या नेत्यांमध्ये मतभेद उघड झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाने शिवसेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावण्याला विरोध दर्शवला आहे.
ज्यांनी आपल्याला “गद्दार’ म्हणून संबोधले आहे, त्यांचे फोटो लावले जाणार नाहीत, असे शिंदे यांचे समर्थक आणि बंडखोर गटाचे आमदार अजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी वंदनीय राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्ष प्रमुख आणि विशेषतः आदित्य टाकरे हे बंडखोरांवर सातत्याने टीका करत राहिले आहेत. या आमदारांना “गद्दार’ म्हणून हिणवले जात आहे.
या गद्दारांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांचे समर्थक विनायक राउत यांनी म्हटले आहे. या नेत्यांनी केलेल्या पापामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सहभागी करून घेतले जाऊ नये, असे ते म्हणाले. दुसरीकडे टाकरे कुटुंबीय कायमच आमच्या हृदयात राहतील असे शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.