मुंबई – हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) कंपनीची पाइपलाइन तोडून त्यातून हजारो लिटर तेल चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. ही टोळी चेंबूर परिसरात असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) कंपनीची पाइपलाइन तोडून त्यातून हजारो लिटर तेलाची चोरी करत होती. या टोळीतील दोघांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीतील किशोर सिरसोडे (वय 36) आणि मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन पठाण ऊर्फ गजू (वय 24) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरसीएफ पोलीस स्टेशनअंतर्गत एचपीसीएल कंपनीच्या आवारात काही जण तेल चोरून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून तपासणी केली. तेव्हा बीपीसीएल कंपनीच्या भिंतीजवळ टॅंकर पार्किंगजवळील शिव अभियांत्रिकी कार्यशाळेच्या मागे तेल चोरी करण्याच्या उद्देशाने लोखंडाच्या पाइपच्या सहाय्याने पॉईंट काढल्याचे निदर्शनास आहे.
पोलिसांनी एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांना बोलावून याची तपासणी करत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून असा प्रकार सुरू होता.