पाथर्डी (प्रतिनिधी)- मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून जाणारा टॅंकर नगर – पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अवघड वळणावर उलटला. यामुळे टॅंकरमधील डिझेलला गळती लागल्याने घाटातील रस्त्यावर डिझेल- डिझेल पसरले होते.या अपघातात सुदैवाने चालक बचावला.
घाटातील रस्ता डिझेलने ओला झाल्याने अनेकमोटारसायकलस्वार घसरून पडले. रविवारी सकाळी 10 च्या सुमारास मुंबईहुन परभणीकडे डिझेल घेवून टॅंकर (क्रमांक एम.एच.-46, बी.बी.-5326) चालला होता. नगर – पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर हा डिझेलने भरलेला टॅंकर उलटला. यानंतर टॅंकरमधील डिझेलचा घाटात पूरच वाहत होता. संपूर्ण रस्ता डिझेलने ओला झाल्याने येणारे-जाणारे मोटारसायकलस्वार घसरून पडले. यात अनेक जण जखमी झाले आहेत.
रिलायन्स जे. एफ. के. कंपनीचा हा टॅंकर होता. टॅंकरचालक बाळासाहेब गर्जे सुदैवाने अपघातातून बचावला आहे.डिझेलचा टॅंकर घाटात उलटल्याने समजताच गावातील व परिसरातील लोकांनी मोठमोठे ड्रम घेवून घाटाकडे धाव घेतली. काहींना भरपूर मिळाले तर काही रिकाम्या हाताने परतले.
अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून सुभाष अकोलकर, वसंत मुखेकर, विवेक मोरे, रमेश भाकरे, संदीप अकोलकर, संतोष खोसे, गणेश शिंदेसह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली.