नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरुवारी डीझेलच्या दरात लिटरमागे 16 पैशांची कपात केली. त्यामुळे जवळपास सहा महिन्यांनी डीझेल स्वस्त झाले. दरम्यान, पेट्रोल दरात कुठलाही बदल करण्यात आला नाही.
मार्चच्या मध्यापासून प्रथमच डीझेलच्या दरात कपात झाली आहे. त्या इंधनाचे दर 7 जून ते 25 जुलै या कालावधीत सतत वाढत राहिले. त्यामुळे संबंधित कालावधीत लिटरमागे डीझेल तब्बल 12 रुपये 55 पैशांनी महागले. त्यानंतर डीझेलची दरवाढ थांबली होती.
आता सार्वजनिक कंपन्यांनी दरात केलेल्या नव्या बदलामुळे दीर्घ कालावधीनंतर डीझेल स्वस्त होण्याची घडामोड घडली आहे. पेट्रोल 7 जून ते 29 जून या कालावधीत 9 रुपये 17 पैशांनी महागले.
त्यानंतर ऑगस्टच्या मध्यापासून पेट्रोलच्या दरात आणखी 1 रूपया 51 पैशांची वाढ झाली. त्यामुळे 7 जूनपासून पेट्रोल 10 रुपये 68 पैशांनी महागले आहे.