डिझेलची 62 हजार तर पेट्रोलची साडेतीन लाख वाहने

पिंपरी  – शहरात सीएनजी वाहन नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या तीन वर्षांत डिझेलच्या 62 हजार 505 तर पेट्रोलच्या 3 लाख 48 हजार वाहनांची नोंदणी झाली असताना सीएनजीची अवघी 24 हजार 255 वाहने नोंदविली गेली. वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे उद्योगनगरीत वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढले आहे. सीएनजीसारख्या इंधनाचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे.

महापालिकेच्या सन 2018-19 च्या पर्यावरण अहवालात इंधन वापरात वाढ होऊन वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषित वायुंच्या उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवा दूषित करणारा नायट्रोजन डायऑक्‍साईड हा वायू प्रामुख्याने वाहनांच्या इंजिनमधील इंधन ज्वलनामुळे निर्माण होतो. यामुळे श्‍वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. दमा, खोकला, हदयरोग, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ अशा आजारांचे रूग्ण वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

सन 2016-17 मध्ये डिझेलवरील 20 हजार वाहने होती. तीन वर्षात ही संख्या 62 हजारांवर पोहोचली आहे. पेट्रोलवरील 1 लाख 11 हजार वाहने होती. ती 3 लाख 47 हजारांवर पोहोचली आहेत. तर, सीएनजी वाहन नोंदणी 4 हजार 165 वरून 24 हजार 255 वर पोहोचली आहे. सीएनजी वाहने वाढली असली तरी एकूण वाहन नोंदणीच्या टक्केवारीत हे प्रमाण अत्यल्प असल्याचे अहवालात नमूद आहे. सीएनजीवर भर देण्याची गरजही व्यक्‍त केली आहे.

“पीएमपी’लाही सीएनजीची गरज

नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पीएमपीएमएलमार्फत सीएनजीवरील बसगाड्यांना प्राधान्य दिले जात असले तरी पीएमपीएमएलच्या स्वत:च्या मालकीच्या बस मोठ्या संख्येने डिझेलवरच धावत आहेत. पीएमपीकडे स्वत:च्या मालकीच्या बसपैकी 810 बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत तर केवळ 563 बस सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. भाडेतत्त्वावरील 577 बस सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जास्तीत जास्त सीएनजी किंवा इलेक्‍ट्रिकवर असावी, असे मत अहवालात व्यक्‍त करण्यात आले आहे. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)