पुणे – नुकतंच झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, 29 फेब्रुवारी रात्री 9 वाजता या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
दरम्यान, आता या मालिकेच्या जागी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून “माझा होशील ना” मालिकेचे अनेक प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत. एका अनोख्या कुटुंबाची आणि हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निमित्ताने पाहता येणार आहे.
प्रेमाचं हेच नातं कसं खुलतं हे सांगणारं माझा होशील ना, मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आलं आहे. कोणतीही मालिका तिच्या शीर्षकगीतातून अगदी सहजपणे उलगडत जाते. याचीच प्रचिती या मालिकेच्या गीतातून होत आहे.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकर हिने गायलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्याचा सुरेल आवाज या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘माझा होशील ना’ ही मालिका २ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.