“उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीसुद्धा बैठकीचे फोटो ट्विट केले का?”; भाजपच्याच खासदाराची खोचक कमेंट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. कमला हॅरिस यांच्यासोबतची बैठक ही मोदींच्या द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी करोना महामारीच्या कालावधीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास कमला हॅरिस यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो पोस्ट केलं. “उपराष्ट्राध्यक्षा असणाऱ्या कमला हॅरिस यांची भेट घेऊन समाधान वाटलं. त्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण जगाला प्रेरणा दिलीय. आम्ही अनेक विषयांवर बोललो ज्यामुळे भारत आणि अमेरिकेची मैत्रीपूर्णसंबंध आणखीन घनिष्ठ होतील. आमची संस्कृती आणि संस्कार यांच्यामधील साधर्म्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली,” असं मोदींनी कमला हॅरिस यांच्यासोबतच्या बैठकीचे फोटो शेअर करताना म्हटलं.

मात्र या फोटोंवर कमेंट करताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कमला हॅरिस यांनी या बैठकीचे फोटो ट्विट का केले नाहीत असा प्रश्न विचारला. “उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीसुद्धा या बैठकीचे फोटो ट्विट केलेत का? आफ्रिकन अधिकाऱ्यांसोबत नंतर झालेल्या बैठकीचे फोटो त्यांनी शेअर केलेलं मी पाहिलं. मात्र मी पाहिलंय त्याप्रमाणे त्यांनी या बैठकी आधी मोदींबरोबर झालेल्या बैठकीचे फोटो शेअर केलेले नाहीत,” असे स्वामी कमेंटमध्ये म्हणाले.

दरम्यान या भेटीमध्ये मोदींनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांबद्दल भाष्य केलं. भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील. भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.