महापौरांनी पुन्हा केली करोना चाचणी ?

सहकारी व्यक्‍तीस करोनाची लागण

पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा एकदा करोना चाचणी केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका जवळच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली आहे. तसेच दोन दिवसांपासून महापौरांनाही सर्दीचा त्रास सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी गुरूवारी सकाळी रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट तसेच आरटी-पीसीआर चाचणी करून घेतली आहे. त्यातील ऍन्टिजेन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला असून आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल शुक्रवारी येणार आहे. दरम्यान, यापूर्वी महापौरांना ऑगस्ट 2020 मधे करोनाची लागण झालेली होती.

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे शहरात रात्रीची संचारबंदी लागू असून शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली. मात्र, त्यानंतरही रुग्णवाढ कायम असल्याचे मागील करोना संक्रमानाच्या काळात बाधित न झालेल्या अनेकांना करोनाची लागण होत आहे.

महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमात नेहमी त्यांच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्यास दोन दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली असून, त्या दिवशी महापौर संपूर्ण दिवस या सहकाऱ्यासोबत होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापौरांनी ऍन्टिजेन टेस्ट करून घेतली असून आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

दरम्यान, महापौरांकडून मागील आठवडाभरापासूनच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थितीची संख्या मर्यादित केली असून सोशल डिस्टन्स तसेच नियमांची अंमलबजावणी करतच त्यांच्याकडून केवळ महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.