आयुक्‍तसाहेब “त्या’ कर्मचाऱ्यांकडून चहापाणी झाला का?

दत्ता साने यांचा आरोप : निलंबितांच्या सेवा प्रवेशाचे सभागृहात पडसाद

पिंपरी – महापालिकेच्या 16 निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या महापालिकेच्या निलंबन आढावा समितीच्या निर्णयाचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सभागृहात आज उमटले. विषयपत्रिकेवर हा विषय नसताना देखील यावर सभागृहात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी थेट आयुक्‍त हर्डीकर यांच्यावर संधान साधत आयुक्‍त साहेब, तुम्हाला या 16 निलंबित कर्मचाऱ्यांकडून चहापाणी झाले का? असा सवाल केला. त्यामुळे महापौर राहुल जाधव यांच्यासह सर्व सभागृृहच अवाक्‌ झाले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 6) पार पडली. महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांना बढती देण्याच्या उपसूचनेमुळे या विषयाला मनसेच्या सचिन चिखले यांनी सुरुवात केली. दत्ता साने यांनी या कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्याची तीव्रता निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. आयुक्‍त अधिकारांचा गैरवापर करुन, करदात्या नागरिकांना आपल्या कृतीने चुकीचा संदेश दिला आहे, असे सांगत आयुक्‍तांचा निषेध केला.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, असे भ्रष्ट कर्मचारी समाजात उजळमाथ्याने वावरता कामा नये. त्याकरिता त्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊन कायमचे घरी बसवा. यासाठी आम्ही महापालिका प्रशासनाच्या मागे ठामपणे उभे आहोत. सीमा सावळे यांनी राजेंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या कारवाईच्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची मागणी केली. या घटनेमागील सर्व घडामोडी उलगडून, यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे स्पष्ट होईल, अशी सभागृहात मागणी केली.

यावर आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत प्रशासनाची भूमिका सभागृहात स्पष्ट केली. या सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासकीय अध्यादेश व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारवाईचा संदर्भ घेतला आहे. महापालिका सभागृह त्याबाबत निर्णय घेऊ शकते, असे सांगत निर्णयाचे समर्थन केले.

आयुक्‍त सांगकामे आहेत का ?
या विषयावरील चर्चेत सहभागी होताना माजी महापौर मंगला कदम यांनी महापालिका आयुक्‍तांचा स्वीय सहाय्यक राजेंद्र शिर्के हे 12 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ महापालिका आवारात सापडला. मात्र, ही लाच त्याने नक्की कोणासाठी स्वीकारली, याचा खुलासा अद्यापपर्यंत झालेला नाही. या प्रकरणात कर्मचारी मात्र भरडला गेला आहे. तर या प्रकरणात वारंवार आयुक्‍त शासन अध्यादेशांचा संदर्भ देत असल्याकडे लक्ष वेधत, आयुक्‍त काय शासनाचे सांगकामे आहेत
का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याबाबत नगरसेवकांचे म्हणणे
प्रशासनाकडून एकाला एक, तर दुसऱ्याला दुसरा न्याय- दत्ता साने
अशा कर्मचाऱ्यांना लाज वाटली पाहिजे- एकनाथ पवार
या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात प्रवेश देऊ नये – दत्ता साने
सेवाप्रवेश नियमावलीत सुधारणा करा- राहुल कलाटे
नोकरभरतीत भूमिपूत्रांना प्राधान्य द्या- संदीप वाघेरे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.