“ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तिथे कोरोना पळून गेला का?”; संजय राऊत संतापले

मुंबई : करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. करोनासोबत लढण्यात केंद्राला अपयश आल्याचाही आरोप यावेळी त्यानी केला. तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं करोना लढाईत अपयशी ठरली असल्याचे सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. “जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं करोनाशी लढण्यात अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले. “करोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला…कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, “केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवं. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे. हे राज्य मोठं आहे. पुणे, नागपूर, मुंबई ही मोठी शहरं आहेत. संपूर्ण देशांचा या शहरांवर भार आहे. याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे. लस, रेमडेसिवीर या गोष्टी भाजपाच्या गुजरातमधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती औषधं घेऊ शकता…पण महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला ती न देणं हा अमानुषपणा आहे”.

“हे राष्ट्र एक आहे आणि ते एक ठेवण्याचा प्रयत्न मला दिसत नाही. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केलं जात असून याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्वात प्रथम विरोधी केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राचा सुद्दा अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दात संजय राऊत यांनी सुनावले आहे.

“त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर करु द्यावं. पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाची काळजी आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार अपयशी झाल्याचं म्हणायचं आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्णय घेऊ देत नाही. हे काय चाललं आहे?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.