प्यॉंगयॉंग – उत्तर कोरियामध्ये कोविडमुळे केवळ एका मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे आणि तेथील हुकुमशाह किम जोंग उन यांनी देशात कोविडचा प्रसार झाल्याची कबुली दिली. त्या पार्श्वभूमीवर राजधानी प्योंगयोंगमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.
स्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी हुकुमशाही राजवटीत असलेल्या या देशाची आरोग्य यंत्रणा अत्यंत दुबळी असल्यामुळे उत्तर कोरियासमोर कदाचित अस्तित्वाचेच संकट उभे राहणार आहे.
उत्तर कोरियात तापाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. यात काही लोकांना ओमायक्रॉन करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर किम जोंग उन यांनी संपूर्ण देशात निर्बंध लादले आहेत. कामाची ठिकाणीही पाळायचे नियम जारी करून संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सैन्यावर आणि शस्त्रास्त्रांवर प्रचंड खर्च करणाऱ्या उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे कंबरडे मोडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या आधारे उत्तर कोरिया करोनाचा सामना कसा करणार याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे.
करोनाची सुरुवात झाली तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यापासून देशात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही असा उत्तर कोरियाने याआधी दावा केला होता. महत्वाचे म्हणजे उत्तर कोरियात एकही व्यक्तीचे अद्याप लसीकरण झालेले नाही. तसेच देशातील आरोग्यव्यवस्था करोनाशी लढण्याइतकी सक्षमदेखील नाही.
उत्तर कोरियाच्या अधिकृत मीडिया रिपोर्टसनुसार, राजधानी प्यॉंगयॉंगमध्ये ताप असलेल्या अनेक लोकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे आणि तेही कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु, सरकारी वृत्तपत्राने किती लोकांची चाचणी केली आणि किती लोकांना कोविडची लागण झाल्याचे सांगितले नाही. या देशात एककल्ली कारभार असून कोणतीही पारदर्शिता नाही.
त्यामुळे करोना संकटात आता त्यांना देवाच्या भरवशावरच मात करावे लागण्याची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एक चीन वगळता या देशाचे कोणाशेही सख्य नाही किंवा कोणालाही येथे मुक्त प्रवेश नाही. हुकुमशाह आपल्याच तोऱ्यात वावरत असल्याचे जगाने पाहिले आहे. त्यामुळे हा देश आतून प्रचंड पोखरला गेलेला आहे. त्यात आता करोनाचे हे संकट त्यांच्या मुळावरच घाला घालणारे ठरले आहे.