नवी दिल्ली : लाहोर उच्च न्यायालयाने माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात ठोठावलेली फाशीची शिक्षा विशेष कोर्टाने बेकायदेशीर ठरवत रद्दबातल ठरवली आहे.
मुशर्रफ यांच्या याचिकेवर खंडपीठाने सोमवारी हा निर्णय दिला. अतिरिक्त अटर्नी जनरल इश्तियाक ए. खान यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयानंतर परवेझ मुशर्रफ यांची शिक्षाही संपुष्टात आली आहे.17 डिसेंबर रोजी या विशेष कोर्टाने माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याचवेळी कोर्टाने असेही म्हटले होते की, कोणत्याही आरोपीच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर चालवलेला खटला बेकायदेशीर आहे.
न्यायमूर्ती मुजाहीर अली नकवी यांच्या अध्यक्षतेखालील लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठामध्ये न्यायमूर्ती अमीर भाटी आणि न्यायमूर्ती मसूद जहांगीर यांचा समावेश आहे.
परवेझ मुशर्रफ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कोर्टाचा निर्णय ‘अनियमितता आणि विरोधाभासांनी भरलेला’ होता. विशेष कोर्टाच्या निकालात पक्षपात आहे. न्यायाधीशांनी बेकायदेशीर अधिकारांचा वापर केला आहे. असे त्यांनी याचिकेतय म्हंटले आहे.
या अपीलमध्ये विशेष कोर्टाच्या स्थापनेला आव्हान देण्यात आले होते. वेगळ्या अपीलमध्ये सहा कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले. त्यात म्हटले आहे की पेशावर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना विशेष कोर्टाचे न्यायाधीश करता येत नाही. विशेष न्यायालयात फक्त हायकोर्टाचे न्यायाधीशच सहभागी होऊ शकतात असा दावा त्यांनी अपिलामध्ये केला आहे.
सरकारच्या परवानगीशिवाय विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. असे या अपीलमध्ये म्हटले आहे. परवेझ मुशर्रफ यांना या प्रकरणात बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच अपीलमध्ये म्हटले आहे की, विशेष कोर्टाच्या निर्णयाचा पॅरा क्रमांक 66 हा पाकिस्तानच्या आणि इस्लामच्या घटनाविरूद्ध आहे. पॅरा क्रमांक 66 मध्ये मुशर्रफ यांच्या पार्थिवाला इस्लामाबादच्या डी-चौकात तीन दिवस लटकवण्यात यावे असा आदेश देण्यात आला होता.
मुशर्रफ यांच्याविरूद्ध काय प्रकरण होते?
पाक राज्यघटनेचे घटनेचे उल्लंघन केल्याबद्दल माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात परवेझ मुशर्रफ फक्त एकदाच विशेष न्यायालयात हजर झाले होते. यानंतर ते कधीही कोर्टात हजर झाले नाही.
माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ मार्च 2016मध्ये परदेशात उपचारासाठी गेले होते. तेव्हापासून ते पाकिस्तानात वापस आलेले नाही.