नवरी आणि नवऱ्यासाठी सुरतमध्ये हिऱ्याचे मास्क!

करोनामुळे सुरतमधील व्यापाऱ्याचा नवा प्रयोग

सुरत –लॉकडाऊन अंशत: शिथिल झाल्यानंतर बरीच विवाहोत्सुक मंडळी लग्न करण्याच्या तयारीत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत दागिने घालण्याला मर्यादा येतात. ही बाब ध्यानात घेऊन सुरतमधील दागिने उत्पादकाने नवरी व नवरदेवासाठी हिऱ्याचे मास्क उपलब्ध केले आहेत.

या नावीन्यपूर्ण मास्कची किंमत दीड लाख रुपये ते चार लाख रुपयांपर्यंत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये दागिन्यांची हौस पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांकडून या मास्कची मागणी वाढली आहे, असे या दुकानदारांनी सांगितले. सध्या दागिन्यांची खरेदी कमी झाली आहे. त्याचबरोबर दागिने तयार करणारे कारागीर आपल्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे हा उद्योग प्रचंड अडचणीत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी सुरतमधील दागिने उत्पादक नवनवे प्रयोग करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिऱ्याचे मास्क उपलब्ध करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

सध्याच्या परिस्थितीतही अनेकांना लग्न करावे लागत आहे. मात्र, दागिन्यांची हौस भागविण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत उपयोगी पडतील असे दागिने आमच्याकडून मागण्यात येत आहेत. यामध्ये हिरे वापरण्याची कल्पना पुढे आली. आम्ही यामध्ये शुद्ध हिऱ्याचे त्याचबरोबर अमेरिकन हिऱ्याचे दागिने विकसित करीत आहोत. आमच्याकडून पुण्यातील एक नागरिक हिऱ्याचा मास्क घेऊन गेला होता. त्या मास्कची किंमत जवळजवळ तीन लाख रुपये होती असे एका उत्पादकाने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.