जन्मापूर्वीच होणार अपंगत्वाचे निदान

दिव्यांग कल्याणकारी योजना : प्रसूतिपूर्व तपासणीसाठी उभारणार दहा केंद्र

पिंपरी – जन्मत:च दिव्यांग असलेल्या बालकांचा शारीरिक, भावनिक, बौध्दिक आणि मानसिक व्हावा या उद्देशाने महापालिकेतर्फे प्रसूतीपूर्व दिव्यांग बाळ ओळखण्यासाठी शहरात प्रायोगिक तत्त्वावर 10 केंद्र सुरू करणार आहे. 5 अंगणवाड्या आणि 5 बालवाड्यांमध्ये हे केंद्र सुरू केले जाईल. प्रसूतीपूर्व दिव्यांग बाळ ओळखण्यासाठी गर्भवती महिलांची आणि प्रसूतीनंतर नवजात बालकांची संबंधित केंद्रात तपासणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत लवकर निदान व शीघ्र हस्तक्षेप केंद्र सुरू केले जाणार आहेत. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या शासकीय संस्थेमार्फत आणि नागरवस्ती विकास योजना विभाग यांच्या समन्वयाने हे केंद्र सुरू केले जाणार आहे. संबंधित केंद्र सुरू करण्यासाठी एकूण 71 लाख 96 हजार 400 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. संबंधित केंद्र सुरू करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या कक्षात विस्तृत चर्चा झाली होती. त्यानंतर त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समिती सभेची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच केंद्र निश्‍चित करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

आणखी 40 केंद्र प्रस्तावित
प्रायोगिक तत्त्वावरील 10 केंद्र सुरू झाल्यानंतर आणखी 40 केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार शून्य ते 4 वयोगटातील 2 हजार 264 विशेष गरजा असलेल्या मुलांना लाभ घेता येईल. पूर्वी अपंग व्यक्ती कायदा 1995 प्रमाणे अपंगत्वाचे 8 प्रकार नमूद होते. तथापि, दिव्यांगांसाठी झालेल्या अपंग हक्क कायदा-2016 अनुसार आता 21 अपंगत्वाचे प्रकार नमूद केले आहेत. त्यामुळे दिव्यांगांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

केंद्रामध्ये नियोजित असलेले कामकाज
– दिव्यांग बाळ ओळखण्यासाठी गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी तर, प्रसुतीनंतर नवजात बालकाची तपासणी करण्यात येईल.
– बालकांच्या विशेष गरजांचे वेळेत निदान व योग्य हस्तक्षेप करून त्यांचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधण्यात येईल.
– घरातील व्यक्तींनी विशेष गरजा असणाऱ्या बालकांना आहे त्या स्थितीत स्वीकारण्यासाठी समुपदेशन करण्यात येईल.
– दिव्यांग बालकांच्या घरातील व्यक्ती व काळजीवाहक यांना वस्तुस्थिती अवगत करून बालकांच्या विशेष गरजांबद्दल माहिती देणे व सक्षमीकरण
– विशेष गरजा असलेल्या बालकांच्या मेंदूचा जास्तीत-जास्त विकास, संवेदनाचे एकत्रिकरण याबाबत पालकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम
– दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष गरजांनुसार स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी आदी विविध थेरपींचा वापर करण्यात येईल.

दिव्यांग बालकांच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या 10 केंद्रांचे काम स्थायी समिती सभेची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हाती घेण्यात येईल. त्यासाठी बालवाड्या आणि अंगणवाड्या निश्‍चित केल्या जातील. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मदतीने महापालिका हा उपक्रम राबविणार आहे.
– उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.