लॉकडाऊनच्या काळात मधुमेहींनी सतर्क राहण्याची गरज

सध्या सुरू असलेल्या करोना विषाणूच्या साथीमुळे अवघे जग लॉकडाऊन झाले आहे. आपल्याही देशामध्ये आपण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातआहोत. या परिस्थितीमध्ये मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जगामधील करोनाबाधितांमध्ये वाढते वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार असणारे रुग्ण जास्त आढळून आले आहे. त्यामुळे करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

मधुमेह रुग्णांची प्रतिकारशक्ती सामान्य व्यक्तींच्या तुलनेत थोडी कमी असल्याने संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरातून बाहेर न पडणे हा सोपा उपाय आहे. तो कटाक्षाने पाळावा. आपल्या नेहमीच्या औषधांचा डोस नियमित घ्यावा. अत्यावश्‍यक कारणांशिवाय दवाखान्यात जाणे सद्यपरिस्थितीमध्ये टाळावे. त्याऐवजी आपल्या डॉक्‍टरांबरोबर फोनवर संपर्क साधावा व काही आवश्‍यक बदल असल्यास तो औषधांमध्ये करुन घ्यावा. शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण वारंवार तपासायला सांगितले असल्यास ग्लुकोमीटरवर साखर तपासून आपल्या डॉक्‍टरांना कळवत राहवे.

कोणत्याही परिस्थितीत निर्जलीकरण म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. थोडे थोडे पाणी दर 15 मिनिटांनी पित राहवे. इन्शुलिनच्या बाटल्या किंवा पेन फ्रिजमध्ये ठेवा. कारण उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण तापमानामुळे ते खराब होण्याची शक्‍यता आहे. लघवीचे प्रमाण खूप वाढणे, खूप कोरड पडणे, भूक खूप लागणे, सतत मरगळ वाटणे ही साखर खूप वाढली असल्याची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे जाणवल्यास रक्तशर्करा तपासून आपल्या डॉक्‍टरांशी संपर्क साधा.

तसेच खूप घाम येणे, चक्कर येणे, अंग थरथर कापणे, डोके दुखणे ही साखर खूप कमी झाल्याची लक्षणे असू शकतात, अशी लक्षणे जाणल्यास त्वरीत साखर, ग्लुकोज बिस्कीट, चॉकलेट यापैकी काहीही गोड पदार्थ खावा व आपल्या डॉक्‍टरांना संपर्क करावा.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मन प्रसन्न ठेवण्यासाठी पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे, नातवडांबरोबर खेळणे, विणकाम, शिवणकाम, जुने फोटोंचे अल्बम पाहणे आदींमध्ये मन रमवा. ही परिस्थिती तात्पुरती आहे हे महत्वाचे मनावर बिंबवा. लॉकडाऊनमध्ये खाण्याकडे विशेष लक्ष घ्या. अती स्निग्ध व तळलेले पदार्थ, जंक फुड, चिप्स आदी खाण्यावर नियंत्रण ठेवा.

शिळे खाणे शक्‍यतो टाळा. दररोज सकाळी कोमट पाणी, हळद व मीठ या मिश्रणाच्या गुळण्या करा. बाहेर जाणे शक्‍य नसले तरी व्यायामामध्ये खंड नको. बसल्याबसल्या हाताचे व्यायाम, घरातील किरकोळ कामामध्ये मदत हाही व्यायाम होऊ शकतो. तसेच गच्चीवर चालणे हाही पर्याय चांगला आहे. मधुमेह रुग्णांनी अशा पद्धतीने काळजी घेतल्यास लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात राहील, वजन वाढणार नाही, प्रतिकार शक्ती चांगली राहिल.
– डॉ. जयदीप रेवले (मधुमेह तज्ज्ञ, सातारा) 

Leave A Reply

Your email address will not be published.