प्रशांत जाधव
सातारा – राज्य शासनाने हुक्क्यावर बंदी घातली असली तरी साताऱ्यात तो तरूणाईसाठी सहज उपलब्ध होताना दिसत आहे. स्ट्रॉबेरीसह अनेक फळांच्या फ्लेवरमध्ये मिळत असलेल्या हुक्क्याची तीव्रता तरूणांच्या लक्षात येत नसली तरी त्यामुळे अनेकांना जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. परिणामी अनेक कुंटुंबे सध्या या हुक्क्याच्या धुरापायी उद्धवस्त होत आहेत. मात्र, याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना खासकरून पोलिसांना याबाबत माहिती नसल्याने सातारा शहरातील तरूणाईचे भविष्य हुक्क्याच्या धुरात काळवंडल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी सहजपणे उपलब्ध होत असलेल्या हुक्क्यामुळे नुसता धुव्वा’ काढण्यात तरूणाई व्यस्त आहे. शहरात अनेक ठिकाणी हुक्का पॉट धडधडीतपणे विक्रीस ठेवले असून याबाबत पोलिसांचे लक्ष नसल्याने तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.
पुणे शहराला लागून सातारा शहर असल्याने काही अंशी त्याठिकाणीची संस्कृती इथली तरूणाई अंगिकारताना दिसत आहे. त्यातील चांगल्या गोष्टीचा स्वीकार तरूणाईसोबत समाजानेही केला आहे. मात्र, हुक्क्याचे फॅड अचानक साताऱ्यात वाढू लागल्याने व त्याकडे जाणाऱ्या तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा विषय यंत्रणेसह पालकांची डोकेदुखी बनला आहे. खरेतर हुक्क्यासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीच डेरा टाकून बसत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी केवळ हुक्क्याचा धूरच काढला. जात नसून सोबत अनधिकृतरित्या मद्यविक्रीही सुरू आहे. ही ठिकाणे पोलिसांना माहीत नसतील असे गृहीत धरले तरी त्याठिकाणी काही मोजक्या पोलिसांचा वावर दिसून येत आहे.
सातारा शहरात हुक्का सहज उपलब्ध होतो. थोड्याशा पॉकेट मनीमध्ये सहज विकतही घेता येतो. हुक्का पुरवणारे दलाल महाविद्यालयांच्या बाहेर गस्त घालून आहेत. तसेच शहरात सहजपणे मिळणारे हुक्का पॉट खरेदी करून तरूण कोणाच्या तरी घरी पार्टी करण्याची सोयही करू लागले आहेत. शहराच्या आसपास असलेल्या काही हॉटेलमध्ये तर कोणतीही परवानगी नसताना तासांच्या हिशेबानेही हा “कश’ मिळू लागला. नाइट लाइफ कल्चरच्या चर्चेने जितका वेग घेतला तितक्याच वेगावे हुक्का पार्लर्सची हवा पुन्हा तरंगू लागल्याने भविष्यात मोठा सामाजिक प्रश्न म्हणून उभारल्यास नवल वाटू नये. तंबाखू, सिगारेट, कच्ची तंबाखू, लावलेली सुपारी, सुंगधी पानमसाला यातून नशा येते. तात्पुरती किक मिळते. पण हुक्का एकदम सेफ असल्याने त्याने काय होतंयं,
हुक्क्याचा धूर आत कुठे जातो, तो तर बाहेर फेकला जातो. आत घेतलेला धूर बाहेर सोडावा आणि त्याची वरवर जाणारी वर्तुळं पहावी, असलं “रॉयल’ लाईफ जगण्याच्या नादात आज अनेक तरूण रूग्णालयाच्या बेडवर जगण्यासाठी देवाकडे धावा करत आहेत. मात्र, याबाबत पोलीस यंत्रणेला काहीच माहिती नसणे हे काही पटणारे नाही. अनेक मोठ्या गुन्हेगारांना सापळा लावून पकडणारे, त्याच्या मागावर राहणारे, मुसक्या आवळणारे साताऱ्याच्या कर्तबगार पोलीसांना ती सापडत नसतील तर ती त्यांच्यासाठी शरमेची बाब आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याची दखल घेऊन हुक्क्याच्या धुरात अडकलेल्या तरूणाईच्या भविष्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या लेकरांना न परवडणारा छंद
मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील पैसेवाल्यांच्या पोरांना “नाईट लाईफ’ सोबत हुक्का पार्लरमध्ये जाऊन धुरांच्या रेषा काढणे परवडते. मात्र, सातारा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असून ही मुले शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे हे असे छंद करत असताना, पोरांनी शिकून मोठं होण्याची स्वप्न पाहणाऱ्या वडीलांच्या खिशाचा अंदाज घेणे गरजेचे आहे. कारण हे असले नाद शेतकऱ्यांच्या लेकरांना न परवडणारे आहेत.
====================