कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही, गांभीर्याने घ्या

धुळे : पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे नागरिकांना आवाहन

धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरी त्याचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी कोरोना विषाणूला गांभीर्याने घेत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

पालकमंत्री सत्तार दोन दिवसांपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल(दि. 12) दुपारी धुळे व साक्री तालुक्याचा पाहणी दौरा केला. त्यानंतर सायंकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, महाराजस्व अभियान, सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे किट वितरण, कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल आशा स्वयंसेविकांचा सत्कार, महाराजस्व अभियानातंर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री सत्तार म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आढळून येणाऱ्या को- मॉर्बिड रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. घरातील वयोवृध्दांची काळजी घ्यावी. मास्कचा नियमितपणे वापर करावा. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर करावा. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे राहिले असतील त्यांचेही पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत.

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूला रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. ते दैनंदिन संपर्कात राहून आढावा घेत होते. कोरोना विषाणूचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.