संगमनेर, (प्रतिनिधी) – लोणीच्या पद्मश्री विखे पाटील स्कूलमध्ये पार पडलेली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी गाजवली.
वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत ध्रुवच्या खेळाडूंनी 24 सुवर्ण, 50 रौप्य आणि 29 कांस्य अशा एकूण 103 पदकांची कमाई केली.
या संपूर्ण स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळाला. या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावणार्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली.
चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात रयांश कानवडे याने अनुक्रमे शंभर, दोनशे आणि चारशे मीटर फ्रिस्टाईल प्रकारात कांस्य पदक मिळवले. आयुष नाईकवाडी याने 50 आणि दोनशे मीटर ब्रेस्टस्ट्रोक, शंभर मीटर बटरफ्लायमध्ये अनुक्रमे दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.
यज्ञाग करपे याने 50 आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्य तर, हिमनेश गुप्ता याने 100 आणि दोनशे मीटरमध्ये रौप्य पदकं मिळवले.
श्लोक पाडेकरने 200 मीटर फ्रिस्टाईल व मिडले प्रकारात रौप्य, राघवेंद्र चौधरी याने 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य आणि या चौघांच्याही सांघिक चमूने चार बाय शंभर मिडले रिले प्रकारात रौप्य पदक पटकावले.
याच वयोगटातील मुलींमध्ये तन्वी कोष्टीने शंभर व दोनशे मीटर फ्रिस्टाईल आणि दोनशे मीटर मिडले प्रकारात सुवर्ण पदक मिळवले.
याना चौधरीला दोनशे आणि चारशे मीटर फ्रिस्टाईल आणि दोनशे मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अनुक्रमे रौप्य व सुवर्ण पदक मिळाले. श्रद्धा भुसाळने 400 मीटर फ्रिस्टाईल, शंभर व दोनशे मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे दोन रौप्य व एक सुवर्ण मिळवले.
सौम्या गाडेने दोनशे मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, अन्वी शाहने 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य, पूर्वा पवारने 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दोन सुवर्ण व एका कांस्य पदकाची कमाई केली.
या चौघींच्याही समूहाने 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल आणि मिडले रिले प्रकारांमध्ये चार सुवर्ण आणि चार कांस्य पदके पटकावली.
सतरा वर्षांखालील मुलांमध्ये आयुष वाडगेने 100 व 200 मीटर फ्रिस्टाईल व शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात दोन रौप्य व एक सुवर्ण, ओंकार कोरडे याने 400 मीटर फ्रिस्टाईल आणि 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अनुक्रमे रौप्य व सुवर्ण, वेदांत मुसळेने 50 व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य व कांस्य आणि मधुरम माहेश्वरी याने दोनशे मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
या चौघांच्याही चमूने 4 बाय 100 मीटर मिडले आणि फ्रिस्टाईल प्रकारात प्रत्येकी चार रौप्य व चार कांस्य पदकं मिळवली.
मुलींच्या गटात सायली मुंगसेने 50 आणि 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दोन रौप्य, स्वरा भामरेने 200 व 400 मीटर फ्रिस्टाईल, 100 मीटर बटरफ्लाय आणि 400 मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण पदक मिळवले.
सर्वदा बाणखेलेने 200 मीटर फ्रिस्टाईल, 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदकं मिळवले.
ओवी भक्कडने 200 मीटर फ्रिस्टाईल आणि 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल रिले प्रकारात रौप्य पदक मिळवले. या तिघींसह वैदेही झारगड यांच्या चमूने 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल व मिडले रिले प्रकारात रौप्यपदक मिळवले.
19 वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य घुलेने 100 मीटर फ्रिस्टाईल व ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात, यश बियाणी याने 50 व 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तर, शौर्य पेटकरने 100 व 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे कांस्य व रौप्य पदके मिळवली.
1500 मीटर फ्रिस्टाईलमध्ये भौमिक गावडे आणि आर्यन शर्मा यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्य पदक मिळवताना यश बियाणी, मनन देसरडा, निशांत चौगुले व भौमिक गावडे यांच्या चमूने 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल व मिडले रिलेमध्ये प्रत्येकी चार रौप्य व चार कांस्य पदके मिळवली.
याच वयोगटातील मुलींनीही विजयाची पताका फडकावताना अन्वी शाहने 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, प्रीती बिबवेने कांस्य, निशिता राणाने 200 आणि 400 मीटर फ्रिस्टाईलमध्ये सुवर्ण कामगिरी केली.
तर, 800 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात पेरिन पोलारने रौप्य मिळवले. आरना भक्कडसह मुलींच्या या गटाने 4 बाय 100 मीटर फ्रिस्टाईल आणि मिडले रिले प्रकारांतही आठ रौप्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवणार्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेचे जलतरण प्रशिक्षक नीलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.