झारखंडच्या मैदानावर धोनीचा गुपचूप सराव

रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने येथील अकादमी मैदानावर बंद दाराआड सराव केल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. झारखंड क्रिकेट संघटनेच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आयपीएल स्पर्धा येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने त्यापूर्वी वैयक्‍तिक सराव करण्यासाठी खेळाडूंना परवानगी मिळाल्याने धोनीने मैदानावर उपस्थिती लावत सराव केला. फलंदाजीसह यष्टीरक्षणाचाही त्याने सराव केला. यावेळी सरावात गोलंदाजीच्या यंत्राद्वारेही त्याने फलंदाजीचे धडे पुन्हा गिरवले. मार्चपासून करोनाचा धोका वाढल्याने चेन्नई सुपरकिंग संघासह सर्व सराव सत्रे बंद झाल्याने खेळाडूंना घरातच अडकून पडावे लागत होते. आता देशात लॉकडाऊनमध्ये काही सवलती तसेच सरावाला परवानगी दिल्याने खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.

आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धोनी उत्सुक आहे. त्यामुळेच त्याने सराव सुरू केला आहे. मात्र, तो सरावाला कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी येणार याची माहिती संघटनेतील उच्चपदस्थांनाच दिली जात असून ग्राऊंडस्टाफ व्यतिरिक्‍त अन्य कोणालाही मैदानात प्रवेश दिला जात नसल्याचेही समजले आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीलाही परवानगी दिली गेली नसून केवळ दोन छायाचित्रकारांनाच परवानगी देण्याबाबत झाऱखंड क्रिकेट संघटना विचार करत आहे. अर्थात, त्यासाठी धोनीची परवानगीही घेतली जाणार आहे, असेही संघटनेने सांगितले आहे.

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडकडून उपांत्य लढतीत भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याच्याशी निवड समितीने संपर्क साधला होता. आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केली तरच भारतीय संघातील धोनीच्या निवडीबाबत विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका देशभरात वाढल्याने ही स्पर्धा अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व अमिराती या देशांनी आपल्या देशात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, असा प्रस्ताव बीसीसीआयला पाठवला होता. त्यातून अमिरातीची निवड करण्यात आली. येथे येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आता ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.