नवी दिल्ली – भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची संघ सहकारी खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा देणारी कार्यप्रणालीच जगातील अन्य कर्णधारांपेक्षाही जबरदस्त होती. तो ज्या पद्धतीने नेतृत्व हाताळत असे तसेच विराट कोहली व रोहित शर्मा यांनी भविष्यात हाताळले तर भारतीय संघाचे जागतिक क्रिकेटवरील वर्चस्व कायम राहील, अशा शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने धोनीची स्तुती केली आहे.
रोहित शर्मा व कोहली यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. धोनीने या दोघांना कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले त्यामुळेच त्यांची कारकीर्द बहरली. धोनीचे हेच गुण या दोघांनीही घेतले पाहिजेत. संघातील नवोदित खेळाडूंना त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळ करुन घेण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांच्यासारख्या नव्या खेळाडूंना धोनीने जसे सांभाळून घेतले, त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व आज ते संघातील सर्वात अव्वल गुणवत्ता असलेले खेळाडूम्हणून पुढे आले. धोनीचीच पद्धत रोहित व कोहलीने वापरली पाहिजे, असेही गंभीरने सांगितले.
संघात स्थान मिळविलेल्या नवोदितांवर निवड समितीने किंवा प्रशिक्षकाने विश्वास दाखवला तरीही कर्णधाराचा विश्वास मिळवणे सर्वात महत्त्वाचे असते. निवड समिती काय किंवा प्रशिक्षक काय ते केवळ सल्ले देऊ शकतात, मात्र प्रत्यक्ष मैदानात कर्णधारच सगळ्या गोष्टी हाताळत असतो. सामन्यात जर संघाची बाजु बिकट बनली तर कर्णधारालाच त्यातून मार्ग काढवा लागतो. अशा वेळी त्याला तुमच्या क्षमतेबद्दल विश्वास वाटला पाहिजे. त्यामुळे धोनी जसा प्रत्येक नवोदिताला जास्तीत जास्त संधी द्यायचा किंवा सामन्यातील परिस्थितीनुसार सूचना द्यायचा तीच हतोटी रोहित व कोहलीने आत्मसात केली पाहिजे, असे मतही गंभीरने व्यक्त केले.
सध्याच्या संघात रोहित व कोहली यांच्यावरच भारतीय संघाची फलंदाजी सर्वात जास्त अवलंबून आहे. कोहली पदार्पणापासूनच एक लक्ष्य समोर ठेवून आपली खेळी उभारतो. ती कला रोहितलाही जमली पाहिजे. खरेतर रोहितबाबत धोनीचा दृष्टिकोन कायमच सकारात्मक होता. त्यामुळेच आता रोहितमध्ये जो कायापालट झाला आहे त्याचे श्रेय धोनीलाच दिले पाहिजे. आता करोनाचा धोका संपुष्टात आल्यानंतर जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हापासून पुढील किमान पाच वर्षांचा कालखंड समोर ठेवत नियोजन केले पाहिजे. त्यासाठी धोनीची कार्यप्रणाली आदर्श ठरेल, असेही गंभीरने सांगितले.