धोनीच्या ग्लव्सवर भारतीय सैन्याचे अनोखे चिन्ह; सोशल मीडियावर कौतूक  

नवी दिल्ली – इंग्लंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनी भेदक मारा करीत दक्षिण आफ्रिकी फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकवण्यास भाग पाडले. भारताने विश्वचषकातील पहिलाच सामना ६ गडी आणि १५ चेंडू राखून जिंकला आहे. या सामन्यात युजवेंद्र चहल आणि रोहित शर्माच्या खेळाच्या उत्तम प्रदर्शनाने क्रिकेटप्रेमी सुखावले आहेत. परंतु, संपूर्ण सामन्यात आणखी एका गोष्टीने लक्ष खेचले ते म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या ग्लव्सने.

धोनीच्या ग्लव्सवर भारतीय सैन्याचे अनोखे चिन्ह होते. धोनीच्या ग्लव्सवर पॅरा स्पेशल-कमांडोचा बॅच होता. हा बॅच बलिदानाच्या नावाने ओळखला जातो. हे विशेष बलिदान चिन्ह पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असते. क्रिकेटमधील यशामुळे भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला २०११ मध्ये टेरीटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पदवी देण्यात आली होती. हा सन्मान मिळविणारा धोनी कपिल देवनंतर दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

धोनी तरुणांचे प्रेरणास्थान असल्याने सशस्त्र दलात सामील होण्यासाठी ते युवकांना प्रोत्साहित करू शकतात. धोनी स्वतः प्रशिक्षित पॅरापटू आहेत. महेंद्र सिंह धोनी प्रादेशिक सैन्यात १०६ व्या रेजिमेंटमध्ये सदस्य आहे. यासोबतच त्यांनी पॅरा स्पेशल-कमांडोचा बॅच वापरण्याची योग्यता सिद्ध केली होती. धोनीच्या ग्लव्सवरील बॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक जण धोनीचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, भारताच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ कसाबसा 227 पर्यंत धावांपर्यंत मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिकेच्या तुटपुंज्या लक्ष्याचा सामना करताना भारताने सलामीवीर रोहित शर्मा याने ठोकलेल्या शतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने समोर ठेवलेले २२७ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारतातर्फे रोहित शर्माने सर्वाधिक १२२, महेंद्र सिंह धोनीने ३४ तर केएल राहुलने २६ धावा ठोकल्या.

https://twitter.com/jagdishjd07/status/1136480779414908928

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)