नवी दिल्ली – क्षणाक्षणाला उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत मोहम्मद शमी याने स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदविली, त्याच्या या कामगिरीमुळेच भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी विजय मिळविला. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने शैलीदार खेळ करीत दिलेली झुंज अपयशी ठरली.
अफगाणिस्तानला विजयासाठी भारताने 225 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्ताने शेवटच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंज दिली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने आपल्या प्रभावी गोलंदाजीने सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. बुमराहने एकाच ओव्हरमध्ये दोन बळी घेऊन अफगाणिस्तानला मोठा झटका दिला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत तीन चेंडूत तीन बळी घेतले. आणि अफगाणिस्तानची विजयाची संधी हिरावून घेतली.
शेवटच्या ओव्हरमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात चांगलाच सक्रिय झालेला दिसून आला. धोनी सातत्याने जसप्रीत बुमराह आणि शमीसोबत संवाद साधत होता. त्यांनी कोणत्या जागेवरून आणि कसा चेंडू टाकावा यावर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी विराट कोहली बाउंड्रीजवळ उभा होता. अशात गोलंदाजीबाबत सर्व निर्णय धोनीने घेतले. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना मैदानावरील फिल्डिंगही धोनीने सांगितली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीने शमीच्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर धोनी तातडीने शमीजवळ गेला आणि यॉर्कर लेंथवर चेंडू टाकण्यास सांगितला. यानंतर शमीने सर्व चेंडू यॉर्कर लेंथवर टाकेल आणि स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदविली.