दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून आव्हान संपले असले तरीही पुढील वर्षी होत असलेल्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व मीच करणार, असा खुलासा महेंद्रसिंग धोनीने केला आहे.
मायदेशी परतल्यावर धोनी चेन्नईचे नेतृत्व सोडणार असल्याचे तसेच आयपीएलमधूनही एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्यावर धोनीने हा खुलासा केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या स्पर्धेत खुद्द धोनीची कामगिरीही खालावली. त्याने स्पर्धेत खेळलेल्या 14 सामन्यांतून केवळ 25 च्या सरासरीने 200 धावा केल्या.
चेन्नई संघाने या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद मिळवले होते. तसेच स्पर्धेत सहा वेळा अंतिम सामन्यात खेळ केला होता. त्यामुळे यंदाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे. त्यांनी अखेरच्या काही सामन्यांत विजय मिळवले असले तरीही त्यांना प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. त्यावेळी आता धोनीची सद्दी संपुष्टात आली असून तो पुढील वर्षीपासून चेन्नई संघाचा केवळ मेंन्टॉर म्हणून कार्यरत राहील व खेळाडू म्हणून निवृत्ती घेईल, असे सांगितले जात होते. त्यावर धोनीने हे वृत्त सत्य नसून मीच संघाचे नेतृत्व करणार असे सांगितले.
मी निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असून त्यात अजिबात तथ्य नाही. केवळ 2021 सालीच नाही तर त्यानंतरही काही वर्षे चेन्नईचे नेतृत्व मीच करणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अपयश आल्याने खूप निराशा झाली असली तरीही हा काही शेवट नव्हे. त्यामुळे या स्पर्धेत झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या उमेदीने पुढील वर्षीच्या स्पर्धेत संघ अत्यंत सरस कामगिरी करेल, असे मतही धोनीने व्यक्त केले.
संघबांधणी नव्याने होणार…
धोनीने निवृत्तीच्या वृत्ताचा इन्कार केला असला तरीही संघव्यवस्थापनाने मात्र भिन्न मत व्यक्त केले आहे. थेट धोनीबाबत भाष्य केले नसले तरीही पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी नव्याने संघ बांधणी केली जाणार आहे. तसेच नवोदीत खेळाडूंना जास्तीत जास्त स्थान देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता संघाने या खेळाडूंच्या बळावर यश मिळवले. मात्र, आता नव्या पिढीकडे धुरा सोपवली जाणार आहे, असे मत संघ व्यवस्थापनाने व्यक्त केल्याने पुन्हा एकदा धोनीच्या भवितव्याबाबत चर्चा रंगण्याची शक्यता आहे.