धोनीच्या तळपत्या बॅटची चाहत्यांना प्रतीक्षा

भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि अर्थातच यशस्वी यष्टीरक्षक कोण असे विचारले, तर महेंद्रसिंग धोनीचे नाव घेण्यासाठी विचारही करावा लागणार नाही. धोनीची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असताना त्याचे एका मालिकेतूल अपयशही चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या असल्या, तरी चाहत्यांना पुढच्या मालिकेत धोनीच्या तळपत्या बॅटची प्रतीक्षा आहे.

भारतीय संघाला दोन विश्‍वचषक जिंकून देणारा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव क्रिकेट इतिहासात अजरामर झाले आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी भारतीय संघात दाखल झालेल्या धोनीने अल्पावधीतच नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्यावहिल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारताला जगज्जेतेपद मिळवून दिला. धोनीने इतक्‍या वेगाने यशाची शिखरे गाठली, की त्याने लोकप्रियतेत आणि व्यावसायिक कमाईत सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु कोणत्याही महान खेळाडूच्या कारकिर्दीचा शेवट कधीतरी होणार असतोच. तसेच धोनीच्या कारकिर्दीचीही आता सायंकाळ झाली आहे. 2015 विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनीने त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरी कायम राखली. मैदानावरील सातत्य कमीअधिक होत असताना त्याच्यावर टीकाही झाली. परंतु टीकाकारांना बॅटनेच उत्तर देणे धोनीने पसंत केले.

धोनी संपल्याची ओरड करणाऱ्यांना चोख उत्तर देताना धोनीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत केलेल्या आश्‍चर्यकारक कामगिरीमुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली होती. परंतु इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतील धोनीच्या अपयशामुळे धोनीच्या टीकाकारांना पुन्हा संधी मिळाली आहे. एकीकडे पुढच्या वर्षी इंग्लंडमध्येच होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाला धोनीची गरज असल्याचा निर्वाळा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली असतानाही धोनीच्या निवृत्तीच्या वावड्या उडविल्या जाऊ लागल्या.

इंग्लंडविरुद्ध अखेरचा तिसरा एकदिवसीय सामना संपल्यावर धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्यानंतरही त्याच्या निवृत्तीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परंतु धोनीने या वादात न पडणेच पसंत केले. दुसऱ्या बाजूला धोनीने आपल्यापेक्षा ज्युनियर आणि दुसऱ्या फळीतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची आपली सवयही कायम राखली आहे. त्यामुळेच दिनेश कार्तिक असो, की ऋषभ पंत, हे खेळाडू आपल्या यशाचे श्रेय मोकळेपणाने धोनीला देताना दिसतात.

आता धोनीच्या पाठीराख्यांना मात्र प्रतीक्षा आहे, ती धोनीच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांची. “बेस्ट फिनिशर’ हा लौकिक कायम राखताना धोनीने भारतीय संघाला सर्वोच्च यश मिळवून देऊनच निवृत्त व्हावे, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. धोनीलाही ते माहीत आहेच. त्यामुळे आगामी काळात धोनी काय चमत्कार करतो, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)