पंड्यात धोनी व युवराजचे कॉम्बिनेशन – गौतम गंभीर

नवी दिल्ली  -भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या सर्वांच्याच कौतुकाचा खेळाडू ठरला आहे. पंड्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सिक्‍सरकिंग युवराज सिंग यांचे कॉम्बिनेशन आहे, अशा शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने त्याचे कौतुक केले आहे. 

पंड्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. धोनी व युवराज यांच्यासारखाच फिनिशर म्हणून पंड्या नावारुपाला येत आहे ही भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याची आक्रमक फलंदाजी व प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर वर्चस्व राखण्याची क्षमता पाहिली की आपण जणु धोनी किंवा युवराज यांचीच फलंदाजी पाहात आहोत असे वाटते. धोनी व युवराज भारतीय संघासाठी पूर्वी फिनिशरची भूमिका वठवत होते. आज हेच काम पंड्या करत आहे, असेही गंभीर म्हणाला.

सामन्याच्या अखेरच्या षटकात 20 ते 25 धावाही सहज फटकावण्याची पंड्याची क्षमता आहे. असे खेळाडू एका षटकात संपूर्ण सामन्याचे पारडे फिरवू शकतात. तो सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे ते पाहता कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करणे पंड्यासाठी सहज शक्‍य आहे. असेच खेळाडू भारतीय संघात मर्यादीत षटकांच्या सामन्यात असले पाहिजेत तरच आगामी टी-20 तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ यशस्वी कामगिरी करेल, असा विश्‍वासही त्याने व्यक्त केला.

निवडीवर होते मतभेद
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीच्या संघात हार्दिक पंड्याच्या निवडीवरुन मतभेद निर्माण झाले होते. पंड्याला केवळ एक फलंदाज म्हणून संघात घेण्याबाबत निवड समितीत काही मतभेद घडले होते. अखेर त्याची निवड झाली असली तरीही त्यात समितीतील तीन सदस्यांनी त्याच्या नावाचा आग्रह धरल्याने त्याला संधी मिळाली, असा खुलासा बीसीसीआयच्या सूत्राने केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समिती पंड्याचा संघात समावेश करायचा की नाही याबद्दल साशंक होती. पंड्या नुकताच पाठीला झालेल्या दुखापतीतून सावरला असल्याने तो गोलंदाजी करण्याचे टाळत आहे. त्यामुळेच त्याची संघात निवड करायला नको असे मत निवड समितीच्या दोन सदस्यांचे होते. मात्र, त्याच्या सारख्या सर्वोत्तम खेळाडूचा संघात समावेश आवश्‍यक असल्याचे मत तीन सदस्यांनी मांडल्यामुळेच त्याचा समावेश करण्यात आला.

पंड्याने एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी-20 मालिकेतही सरस कामगिरी केल्यामुळे आता त्याचा कसोटी मालिकेतील संघातही समावेश व्हावा अशी मागणी जोर घरत आहे. 17 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. याच सामन्याद्वारे या दोन संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.