डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण; पेठांचे परिसरही डासांचे माहेरघर
पुणे – शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत 1,122 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यात सर्वाधिक 215 रुग्ण ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सापडले आहेत. त्यातही उच्चभ्रू असलेला कोरेगाव पार्क तसेच काही मोठ्या सोसायट्यांचा समावेश आहे.
येरवडा आणि नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीतही डेंग्यू रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. याशिवाय मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या कसबा-विश्रामबागवाडा तसेच भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही 100 पेक्षा अधिक रुग्ण आढले आहेत. त्यामुळे हा उद्रेक रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे.
शहरात डेंग्यू रुग्णांचे ट्रॅकिंग महापालिकेकडून केले जाते. त्यानुसार त्या रुग्णाच्या घर परिसरात डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून औषध फवारणी केली जाते. त्यानुसार डेंग्यू रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय माहिती महापालिकेने संकलित केली आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. तर, येवलेवाडी तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येका 7 रुग्ण आढळून आले आहेत, असे या आकडेवारीतून समोर आले आहे.
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी उत्पत्ती
उपनगरांत ज्या क्षेत्रीय कार्यालय हद्दीत डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागांत प्रामुख्याने नव्याने सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले आहेत. तर मध्यवर्ती पेठांमध्ये रुग्णांच्या निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास आढळून आली आहे. टेरेसवर साठवलेल्या कचऱ्यातही पाणी साठून डासोत्पत्ती झाली आहे. शिवाय ज्या घरांमध्ये दीड ते दोन महिन्यांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्या घरांमध्ये दुसऱ्यांदा डासांची पैदास आढळून आल्याने महापालिकाही हैराण झाली आहे.