फलटण – ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फलटण शाखेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण पोलिसांनी सोसायटीचा चेअरमन सतीश पोपटराव काळे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने दि. 12 फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी काळे याला जेरबंद केले. ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फलटण शाखेतील ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी गेल्या वर्षी मे महिन्यात सोसायटीचा चेअरमन व संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या गुन्ह्यात पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे, या तपासात काय झाले, याची माहिती मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याच सोसायटीच्या संचालकांविरुद्ध साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल केले नव्हते.
त्यामुळे संशयितांना जामीन मिळाला होता. तसाच प्रकार फलटण पोलीस ठाण्यातही आहे का, अशी भीती ठेवीदार व्यक्त करत होते. याबाबत वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. या दणक्यामुळे फलटण पोलिसांनी सोसायटीचा चेअरमन सतीश काळे यास काल (दि. 12) अटक केली. त्याला न्यायालयाने शनिवार, दि. 15 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहेत. पोलीस उपनिरीक्षक बनकर तपास करत आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे सोसायटीच्या ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी “प्रभात’ला धन्यवाद दिले आहेत.