नवी दिल्ली – सध्या बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे व्हिडिओ देशभरात खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर बरीच चर्चाही होत आहे. काही लोक बाबांच्या दाव्यांवर शंका घेतात तर काही बाबांना चमत्कारिक मानतात. मात्र, बागेश्वर बाबांबाबत लोकांचे मत फारसे वेगळे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याबाबत आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की, “आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. बोस यांनी नारा दिला होता, पण आज आम्ही नवा नारा दिला आहे… तुम मेरा साथ दो हम हिंदू राष्ट्र बनायेंगे..!” असं ते म्हणाले होते.
दरम्यान, लवकरच आता धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत. 2 ते 3 दिवसांत दोघांमध्ये भेट होणार आहे. धीरेंद्र शास्त्रींनी योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री हे निर्मोही आखाड्याचे महामंडलेश्वर महंत संतोष दास उर्फ सटुआ बाबा यांच्यासह मुख्यमंत्री योगींची भेट घेणार आहेत.
या भेटीत ते 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बागेश्वर धाम इथं होणाऱ्या सामूहिक विवाह कार्यक्रमासाठीही त्यांना निमंत्रित करणार आहेत. बागेश्वर बाबा यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी शुक्रवार, 27 जानेवारी रोजी भेटीची वेळ मागितली होती, परंतु काही कारणांमुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली असून, आता 2 फेब्रुवारीला प्रयागराजच्या माघ मेळ्यात सकाळी 8:00 वाजता ते योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.