Shikhar Dhawan | धवनची कसोटी व टी-20 कारकीर्द धोक्‍यात

पुणे – भारतीय संघाचा सलामीवीर आक्रमक फलंदाज शिखऱ धवन याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत अफलातून फलंदाजी केली असली तरीही त्याची कसोटी तसेच टी-20 मधील कारकीर्द धोक्‍यात आली आहे.

शुभमन गिल, इशान किशन, मयंक आग्रवाल, लोकेश राहुल व पृथ्वी शॉ या सेकंड बेंचमधील खेळाडूंच्या कामगिरीमुळे कसोटी तसेच टी-20 संघात धवनला गेल्या अनेक सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.

धवनने 140 एकदिवसीय तर, 65 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 5 हजार 906 व 1 हजार 673 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत धवनला पहिल्या सामन्यात संघात स्थान मिळाले होते. मात्र, त्याला सरस कामगिरी करता आली नाही व त्याचे संघातील स्थानही गेले. त्यानंतर इशान किशनला संधी देण्यात आली. या संधीचे किशनने सोने केले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात किशनने अर्धशतकी खेळी केली तर पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवनेही दमदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोन खेळाडूंमुळे धवनला पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातच रोहित शर्मा, राहुल, गिल यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे धवनच्या संघातील स्थानाला धोकाच निर्माण झाला आहे.

त्यातच कसोटीत आग्रवाल, राहुल, रोहित असे सार्थ पर्याय समोर असल्यामुळे धवनचा कसोटी संघासाठीही विचार झालेला नाही. त्याला दुखापतीमुळे यंदा अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. त्याने तंदुरुस्त ठरल्यावर देशांतर्गत सय्यद मुश्‍ताक अली व विजय हजारे स्पर्धांमध्येही त्याने फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे येत्या काळात त्याला भारताच्या कसोटी तसेच टी-20 संघात स्थान मिळणे अत्यंत कठीण बनले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने 98 धावांची खेळी केली. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सातत्यपूर्ण असल्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्‍चित आहे. मात्र, आता त्याला कसोटी व टी-20 संघात स्थान मिळण्याची शक्‍यता खूपच कमी राहिली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ याने विजय हजारे स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केल्यामुळे त्याचेही धवनसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.