आबूधाबी – सलामीवीर शिखर धवनच्या 78 तर शेमरन हेटमायरच्या नाबाद 42 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 20 षटकांत 190 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजीत बढती मिळालेल्या मार्कस स्टोनिस व सलामीवीर शिखर धवन यांनी सार्थ ठरवला. या जोडीने 86 धावांची सलामी दिली. आक्रमक खेळ करत असलेल्या स्टोनिसला रशिद खानने आप्रतिम गुगलीवर चकवले व त्रिफळाबाद केले. त्याने 27 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावत 38 धावांची खेळी केली.
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने धवनला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. दरम्यान धवनने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. अय्यर मात्र, तो देखील अनावश्यक फटका मारुन 21 धावांवर बाद झाला. त्याने धवनच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 38 धावा जोडल्या.
अय्यर परतल्यावर शेमरन हेटमायर धवनला साथ देण्यासाठी आला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 52 धावांची बहुमोल भागीदारी केली. धवन शतकाकडे वाटचाल करेल असे वाटत असतानाच 78 धावांवर बाद झाला व ही जोडी फुटली. त्यानंतर हेटमायरने घावांचा वेग वाढवला. त्याच्यासह खेळताना ऋषभ पंतला मात्र, धावा घेणे जमतच नव्हते. हेटमायर 42 तर, पंत 2 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीने 20 षटकांत 3 बाद 189 धावांपर्यंत मजल मारली.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 3 बाद 189 धावा. (शिखऱ धवन 78, मार्कस स्टोनिस 38, श्रेयस अय्यर 21, शेमरन हेटमायर नाबाद 42, ऋषभ पंत नाबाद 2, रशिद खान 1-26, संदीप शर्मा 1-30, जेसन होल्डर 1-50).