मुंबई : मुंबईतील धारावीमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.
धारावीतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टरांचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत संपूर्ण मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100वर पोहचली आहे.