Dharmaveer 2 | Teaser | Anand Dighe : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांनी या टीझरला चांगली पसंती दिली आहे.
मात्र, या टीझरमधील एक गोष्ट काहींना खटकली आहे. त्यामुळे चित्रपटाला फटका बसणार का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात.
राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. महिलांना घेऊन जेव्हा आनंद दीघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती जी बॅकग्राऊंडमध्ये दाखवली आहे. त्याऐवजी मालगाडी जाताना दाखवली असती तर बरं झालं असतं. ते व्हिएफएक्सने सहज शक्य होतं. अशी कमेंट एका युजरने केली आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणून दिली.
नेमकं टिझरमध्ये काय आहे?
हा व्हिडीओ प्रदर्शित करत ‘ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की….धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर – २… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ असं म्हटलं आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये, एक मुस्लिम महिला आनंद दिघे यांच्याकडे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला येते.
तेव्हा तिला आनंद दिघे बुरखा काढायला सांगतात. चेहरा दाखवण्यास सांगितलं जातं. ती महिला चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं आनंद दिघे यांना दिसतं. ते पाहून त्यांचा संताप होतो.
त्यानंतर बहिणीचं रक्षण करण्यासाठी राखी बांधायला आलेल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन आनंद दिघे त्या महिलेच्या घरी जातात. यावेळी “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला शिक्षा देताना दिसतात.
येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. यंदा हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.प्रसाद ओक पुन्हा एकदा ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.