टांगेवाला ते मसाला किंग

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

नवी दिल्ली- देशातील दिग्गज मसाला कंपनी एमडीएचचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. मसाला किंग या नावाने जगभर प्रसिध्द असलेले गुलाटी 98 वर्षांचे होते.
आपल्या एमडीएच या ब्रॅंडच्या माध्यमातून त्यांनी जगभर प्रतिष्ठा संपादन केली होती.

भारत पाक फाळणीच्या वेळी तेथील हिंसाचार पाहून व्यथित झालेले गुलाटी सगळे सोडून भारतात आले आणि पाहता पाहता त्यांनी देशात आपले मसाल्याचे साम्राज्य उभारले. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही त्यांची ओळख निर्माण झाली होती.

गुलाटी यांना उद्योगात मिळालेले हे यश मात्र काही एका रात्रीत घडलेला चमत्कार नव्हता, तर त्यामागे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम आणि तपश्‍चर्या होती. केवळ पाचवी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे त्यांच्या पित्याचे महाशिया दी हट्टी नावाचे अर्थात एमडीएच हे मसाल्याचे दुकान होते. त्या काळी धर्मपाल गुलाटी या व्यवसायात पित्याला मदत करायचे. तेव्हाच त्यांनी शाळा सोडली.
1947 मध्ये फाळणी झाली. त्यावेळी मोठा हिंसाचार सुरू होता. त्या रक्तपाताने त्यांनी घायाळ केले. त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते केवळ 1500 रूपये घेउन दिल्लीत दाखल झाले. तत्पूर्वी त्यांना काही दिवस अमृतसरच्या शरणार्थी शिबिरातही राहावे लागले.

सुरूवातीच्या दिवसांत दिल्लीत कुटुंबाचे पालन पोषण करण्यास अडचणी येत होते. त्यावेळी त्यांनी टांगा खरेदीचा निर्णय घेतला व दिल्लीच्या रस्त्यांवर तो चालवलाही. चुन्नीलाल आणि चानन देवी यांच्या पोटी त्यांनी 27 मार्च 1933 रोजी जन्म घेतला. जेव्हा त्यांनी टांगा विकत घेतला तेव्हा तो त्यांना चालवताही येत नसे, असे त्यांनीच त्यांच्या एका मुलाखतीत एकदा सांगितले होते.

टांगा चालवून काही पैसे गाठीशी जोडल्यानंतर दिल्लीच्याच करोल भाग परिसरात त्यांनी अजमल खां रस्त्यावर एक मसाल्याचे दुकान सुरू केले व त्यानंतर त्यांचा एक मसाला किंग बनण्याचा प्रवास सुरू झाला. आज केवळ भारतच नव्हे, तर जगाच्या काना कोपऱ्यातून त्यांच्या मसाल्याला मोठी मागणी आहे.

रोज सकाळी चार वाजता त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. सुरूवातीला पंजाबी बिटसवर व्यायाम केल्यानंतर ते फलाहार घेत असत. त्यानंतर नेहरू पार्क येथे मॉर्निंग वॉक. दिवसभर केवळ पराठे आणि रात्रीच्या जेवणात मलई आणि दुधाचे पदार्थ. तत्पूर्वी सायंकाळी पुन्हा चालण्याचा व्यायाम असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यामुळे वयाच्या 98 व्या वर्षीही ते तरूण आणि तरतरीत दिसायचे.

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण किताब देउन त्यांचा गौरव केला होता. केवळ पंधराशे रूपयांत सुरू केलेला आपला मसाल्याचा व्यवसाय त्यांनी 2 हजार कोटींपर्यंत नेला आणि त्याच्या जाहीरातीत काम करून त्यांनी स्टारडमही मिळवले. त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अक्षरश: रांग लागायची. याचा त्यांना मनस्वी आनंद होता. लोकांचे प्रेम हेच आपले व्यसन असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
त्यामुळे केली जाहीरात
एमडीएचच्या जाहीरातीमुळे धर्मपाल गुलाटी घराघरांत पोहोचले. मात्र ही जाहीरात त्यांनी योगायोगानेच केली. त्याचे झाले असे की त्या जाहीरातील वधूच्या पित्याची भूमिका करणारा कलाकार वेळेत पोहोचू शकला नाही. तेव्हा दिग्दर्शकाने थेट गुलाटींनाच तुम्ही हे काम करणार का, असे विचारले. तेव्हा काही पैसे वाचतील म्हणून आपण ही जाहीरात व ती भूमिका केली असा किस्साही गुलाटी सांगतात.

त्यांना प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची हौसही होते, असे त्यांचे कार्यालय आणि एकूणच त्यांच्या राहणीमानावरून लक्षात येते व त्यामुळे ते चर्चेचाही विषय ठरले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.