धारावीने करून दाखविले

करोना नियंत्रणाची डब्ल्यूएचओकडून कौतुक

मुंबई – देशासह राज्यात करोनाबाधितांचा वाढता आकडा हा चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईतही करोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील करोना संसर्ग रोखण्यात प्रशासने मिळविलेल्या यशाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. या कामगिरीचे कौतुक करत जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ)ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील पाठ थोपाटली आहे.

जगात अशी अनेक उदाहरणे आहेत. महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याचीच काही उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे, धारावीमध्ये करोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले. चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेत त्यांचे अलगिकरण करणे हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे, असे मत डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी व्यक्‍त केली आहे.

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावीत करोनाने हातपाय पसरायला सुरु केले. धारावीतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे करोनाला आवरणं कठीण होईल की काय याची भीती होती. गेल्या महिन्यात धारावीत दिवसाला 80 ते 90 रुग्ण आढळले होते.

यानंतर विशेष मोहिम राबवित घरोघरी जावून 47 हजार 500 घरांमध्ये तपासण्यात आली. तसेच 3.6 लाख नागरिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ऍक्‍टीव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्‍शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि कॉरंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते. तसेच 14 हजार 970 लोकांचे मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग करण्यात आले. तर 8 हजार 264 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे करोना संसर्ग रोखण्यात यश आले असून बाधितांची संख्येतही सातत्याने घटली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून करोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर करोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवले. धारावीसारख्या परिसरात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. तर ऍक्‍टीव्ह रुग्णांची संख्या केवळ 166 आहे.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave A Reply

Your email address will not be published.