साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता धनुष लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. “द एक्स्ट्रा ऑडिनरी जर्नी ऑफ द फकीर’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान धनुषने याबाबत दुजोरा दिला आहे.
याप्रसंगी धनुषसोबत दिग्दर्शक केन स्कॉट आणि संगीतकार अमित त्रिवेदी हजर आहे. धनुष हा “रांझणा’चे दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत एका हिंदी चित्रपटात काम करणार असल्याचे समजते.
याबाबत धनुषला विचारले असता तो म्हणाला, मी लवकरच त्यांच्यासोबत एका चित्रपटासाठीचे चित्रिकरण सुरू करणार आहे. परंतु त्यासाठी मला एक चांगली स्क्रिप्ट हवी आहे. लवकरच माझ्या आगामी हिंदी चित्रपटाची अधिकृत माहिती देण्यात येईल असे धनुष म्हणाला.
दरम्यान, आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट असलेल्या “द एक्स्ट्रा ऑडिनरी जर्नी ऑफ द फकीर’बाबत धनुषने सांगितले की, या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. तसेच दिग्दर्शक आणि चित्रपटातील टीमसोबत काम करण्याचा चांगला अनुभव राहिला. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर येणार असून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.